Saturday, 31 December 2016

नाजूक ,कणखर आणि शक्तीशाली ...



दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईतील फोटो जर्नालिस्ट महिलेवर झालेला बलात्कार असो की हल्लीच लोणावळ्यात सात वर्षांच्या चिमुकलीबाबत झालेलं प्रकरण असो. पुन्हा महिलांची सुरक्षा आणि इतर सर्वच जुने प्रश्न नव्याने सर्वान समोर आले. त्यातच दिल्लीपेक्षा मुबंई सुरक्षित असे तुलनात्मक मुद्दे आणि त्या मुद्द्यांवर सोशल नेटवर्किंग साईट्सवर पोस्ट आणि त्यावर हे भल्या मोठ्या कमेण्ट्स पडू लागल्या.



अखंड मानव जातीला कलंक असणारे बलात्कार, विकृत हत्या, अपहरण, खून-हाणामाऱ्या, हे सारं कधी थांबणार? कोण थांबवेल हे सारं? असे एक आणि अनेक प्रश्न मनात येऊ लागतात आणि कुठलंच आशादायी चित्र दिसत नाही म्हणून मन पुन्हा हतबलतेच्या दिशेने रवाना होतं. या सर्व घटनांमुळे मनात कुठेतरी एक भीतीची तडी खोलवर निर्माण होते.



हे सारं एकीकडे असताना असाही विचार मनात डोकावतो की, विकृती माणसात असते. सरसकट सगळ्यांच्यात नसते. तसेच हे विकृत लोक एखाद्या शहरातील एखाद्या कोपऱ्यात असतात. त्यांची संख्या नगण्य असते. मात्र, अशा विकृत प्रवृत्तींमुळे संपूर्ण शहर बदनाम होत असतं.



शहरं किंवा कोणतंही ठिकाण हे चांगलं किंवा वाईट नसतं, तर वाईट असते तेथील परिस्थिती, तेथील लोक. कारण तेथील परिस्थिती आणि तेथील लोक यांच्यातूनच शहर बनलेलं असतं.



असा सारा विचार करता करता मी माझ्या जिवलग ‘मुंबईनगरी’च्या आरपार पोटात शिरली. ही'स्वप्ननगरी' कधीही न झोपणारी. मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. मला स्वत:चे असे विविध रंग आहेत. जो इथे येतो तो इथल्या रंगात रंगून जातो.मला विविध रंग आहेत .तरीही मी एकटी आहे. मी प्रसंगी कठोर,कणखर खंबीर आहे. तर कधी घाबरलेली बिथरलेली आणि हळवी आहे. मी खुली आहे सर्वानसाठी पण आत खुप गोष्टी दडवलेल्या आहेत.

                           


एखादी लहान मुलगी तिच्या बालपणी जशी उत्साही उत्सुक आणि अस्वस्थ असते. तिच्या जगाबद्दल तिच्या जगाबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे 'मुंबई' देखिल स्वतंत्र पंख विस्तारुन झेप घेणाऱ्या पक्ष्याप्रमाणे स्वतंत्र आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशाच आकर्षण 'मुंबई' आहे.ती तिच्या सर्व 'मुंबईकरांचे' संरक्षण करण्यास तयार असते. ह्या शहरांकडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ती बऱ्याच व्यापाराचं केंद्रस्थान आहे.


लोकांवर प्रेम करण्याच्या बाबतीत मुंबई ही कॉलेज कुमारी तरूणी सारखी कधी गोंधळलेली असते. तर ती कधी अनिश्चित आहे इथल्या प्रत्येक मुली प्रमाणे. पण ती एका'आई' प्रमाणे सर्वांवर सारखंच प्रेम करते. प्रत्येक नागरिकावर ती तितकच प्रेम करते. भले ही तो गरिब असो वा श्रीमंत, हिंदू असो वा मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय किंवा इतर कोणीही. आपणच एक असतो भेदभाव करणारे मुंबईसाठी.


तरीही आपल्या मनात खोलवर एक भीती असते की दहशतवाद,बॉम्बस्फोट आणि इतर नैसर्गिक आपत्तीची. पण मुंबई आपणा सर्वांना बांधून ठेवते. याचच एक उदाहरण म्हणजे 26 जुलै, 2006 ला मुंबई पाण्याखाली गेली होती, तेव्हा इथे कोणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख,पारसी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय नव्हते. इथे सर्व 'मुंबईकर'होते. हे सर्व आपल्याला ह्या मुंबईने शिकवलं. इथल्या परिस्थितीने शिकवलं.


मुंबई आपल्या सर्वांचं स्वागत खुल्या मनानं करते. त्यातले काहीच तिचं ऋण फेडतात. तिचं प्रेम तिला परत करतात. ह्या अनुभवावरून मला वाटलं की 'मुंबईनं' मला नवी उमेद दिली. मुंबई ने आपल्याला माणूस'एक मुंबईकर' म्हणून जगायला शिकवलं. ती इथे नेहमी आपल्यासाठी नवीन संधीसह, नवीन मार्गासह,नवीन प्रवासाठी, नवीन ठिकाणासाठी,नवीन शोधासाठी असणार. मरिन लाईन्सच्या गोंधळात विचार करत कुठे पोहचले त माझं मलाच समजलं नाही आणि घरी जायला उशीर झाला.पण पुन्हा इथे मनात भिती नव्हती,इथे काळजी घ्यायला मुंबई बरोबर होती. लहानपणी भिती वाटल्यावर आईच्या कुशीत जस डोकं ठेऊन झोपल्यावर सारी भिती पळून जायची त्याच प्रमाणे मरिन लाईन्सच्या कठड्यावर पाय हलवत बसून मनातील भिती हळूहळू कमी होत होती.



 - सिद्धी बोबडे