Wednesday, 14 August 2019

एक दिवस

एक दिवस जगण्यासाठी प्रेमाची गरज नसेल
नाही हवे असतील खूप सारे दोस्त
एक दिवस रस्त्यावर एकटंच चालणं आवडेल
एक दिवस डोळे ऑफिस मध्ये कोणाची साथ शोधणार नाहीत
एक दिवस एकटं खाण्याची सवय पडेल
एक दिवस  आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर नसतील काही हेवेदावे
एक दिवस कोणाच्या खोटं बोलण्यावR राग नाही येणार
एक दिवस वडलांच्या अपेक्षाचं ओझं नाही वाटणार
एक दिवस तापने फडफडलेलं शरीर कोणाच्या प्रेमाच्या स्पर्शाची अपेक्षा नाही ठेवणार
एक दिवस आवडीच्या कपात चहा नाही मिळाला तर चिडचिड नाही होणार
एक दिवस ट्रेन उशीरा येण्याने तोंडून शिव्या नाही येणार
एक दिवस लोकांचा आरडाओरडा मन उदास नाही करणार
एक दिवस लोकांचा आक्रोश मन सुन्न करणार नाही
एक दिवस कोणाचं  आयुष्यातून जाणं पोकळी निर्माण नाही करणार
एक दिवस कोण मनापासून नाही आवडणार
एक दिवस हसण्याचा करार नाही होणार
पण जोपर्यंत तो दिवस येत नाही तोपर्यंत हे सगळं वारंवार होत राहील

- सिद्धी बोबडे

Sunday, 28 April 2019

ओला श्वास...

मला पावसाच्या सरी नाही व्हायचं,
त्या मला थांबवतात
कधी - कधी घरातून बाहेर पडण्यापासून...
मला व्हायचं आहे तो ओला श्वास...
जो पावसानंतर मोकळ्या आभाळाखाली मिळतो...
तो तजेला
जो काही मिनिटा मध्येच हवेत पसरलेल मळभ साफ करतो...
तो उत्साह ज्यात लोक वाऱ्याच्या आनंदात
त्याच्या बरोबर बोलत फिरतात...
तो नजारा जो लोक सामावून घेतात आपल्या डोळ्यांमध्ये..
#NaPoWriMo

- सिद्धी बोबडे

Friday, 26 April 2019

आता आठवण नाही येत...

"अजून आठवण येते?"
"सुरुवातीला यायची, आता नाही येत."
असं कसं होऊ शकतं?"
"असंच होत जातं, सब्स्टीट्यूट आहेत या दुनियेत, सगळ्यांकडे  सगळ्याचे."
"नाही, असं नाही होत, झोपेतून अचानक जाग येते. झोप तुटते...अपूर्ण राहते... विचारामध्ये तासनतास निघून जातात, जेवताना जेवनाकडे लक्ष लागत नाही, वाचायला घेतलेलं अर्धवट राहतं... लिहायला घेतलं तर अर्धवट राहतं... काही सुचतचं नसतं... कोणत्याच कामात लक्ष लागत नाही.आभाळ पाहता पाहता अश्रु घरंगळु  लागतात.
मित्र मैत्रिणी बरोबर गप्पांमध्ये पण लक्ष लागत नाही.. दोस्तों से झूटी मुठी दुसरों का नाम लेके, फिर तेरी बातें करना...असं काही तरी घडत असतं... प्रत्येक दुसऱ्या विषयात तोच विषय शोधत राहतो."
"हे सगळं तर होतंच असतं पण 
उत्तर हेच द्यायचं असतं की, आता आठवण नाही येत...."

- सिद्धी बोबडे

Tuesday, 12 March 2019

शहरांच्या एकटेपणावर जालीम उपाय

तू बऱ्याच वर्षांनी अशा ठिकाणी भेट..... जे आपल्या दोघांसाठी अनोळखी असेल. लगेच ओळख दाखवू नकोस. विचार कर, काही आठव आणि मग जेव्हा आपल्या दोघांमधली आठवण आठवेल..... तेव्हा जरा हसून जमिनीकडे बघ. कारण माझ्या डोळ्यांकडे बघून कदाचित तुला हसू नाही येणार. मग माझं नाव घे, इतक्या हळू की मला ऐकू नाही येणार. पण मी मात्र नेहमीप्रमाणे तुझे ओठ वाचू शकेन. मग काही वेळ आपण दोघे शांत राहू. मग तू विचारशील की कशी आहेस ? मी म्हणेल त्या थंडी सारखी जिला आपण सोडून पुढे गेलो होतो. मग मी विचारेन तू कसा आहेस? तू उत्तर देशील थंडीतल्या त्या शेकोटी सारखा. मी म्हणेन जिला मी बऱ्याच वर्षांपासून मनात पेटवत ठेवलं आहे. मग दोघं एकत्र चालायला लागूया... तोपर्यंत जोपर्यंत हे अनोळखी शहर आपलं नाही वाटत. ऐकलं आहे प्रेम शहरांच्या एकटेपणावर जालीम उपाय आहे.

- सिद्धी बोबडे

Monday, 25 February 2019

अपनी फेवरेट

वाऱ्याची झुळूक आणि वाऱ्यावर उडणारा दुप्पटा हा शॉट पूर्ण चित्रपटात नायिका जितकी सुदंर दिसते त्यापेक्षाही अधिक सुंदर दिसतो.
असा वारा खऱ्या आयुष्यात  जितक्या वेळा आला तेंव्हा मन कधी ना कधी तरी फिल्मी झालं. मस्त मुराद वागायची इच्छा झाली.
यश राज फ़िल्मसने तर तरुण वयातील प्रत्येक मुलीच्या मनात कधी माधुरी कधी सोनाली तर कधी मेरे ख्वाबों मे जो आए वर थिरकणारी काजल सारखं होण्याची इच्छा निर्माण केली.
मनीषा कोईराला ची सादगी, सोनाली बेंद्रे चं खळखळून हसणं तर कधी दिल तो पागल है मधल्या माधुरी दीक्षित सारखं सुदंर दिसण... पण त्याहीपेक्षा जास्त मनाला काय आवडलं असेल तर अनिल कपूर आणि अमीर खान यांचा पडद्यावर दाखवलेला प्रेम करायचा अंदाज.
गाणं ऐकलं होतं एक लडकी को देखा तो ऐसा लगा... जे गाणं भारीच आवडलं होतं. पण मी कुठे मनिषा कोईरला बनू शकणार होती, की माझ्यासाठी कोणी १९४२ चा अनिल कपूर, १९९९ चा सरफरोश मधला अमीर खान असणार आहे. खऱ्या आयुष्यात कुठे होतं असं? सर्व विचार आणि स्वप्नांच्या गोष्टी. जश्याच्या तश्या दबून गेल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी गुपचूप.
शाळा संपली कॉलेजला जाऊ लागली. प्रवास करायला सुरुवात झाली.
उपनगरातून शहरात कॉलेजला जाऊ लागली. आयुषं थोडं कठीण झालं पण फॅण्टसी अजूनही कायम होती.
९० च्या दशकातील फ़िल्मस् मधील रोमँटिक किस्से अजूनही होते आत कुठेतरी लपलेले. कॉलेज मध्ये शिक्षण सुरू होतं...आणि शिकताना समजलं की सुदंरतेचं प्रतिमान बदलत असतं.
    
थोडी वर्ष गेली आणि आला एक नविन कन्सेप्ट Love Your Self सिनेमात जेव्हा गीत च्या किरदारात करीना कपूरला पहिल्यांदा हा डायलॉग बोलताना पाहिलं की 'मैं अपनी फ़ेवरेट हूं।' काहीतरी बदललं होतं... किंचित नाही तर खोलवर.
इम्तियाज च्या या फिल्म मध्ये गीत मुलाला ( शाहिद कपूरला) स्वतः विचारते मैं तुझे बहुत अच्छी लगती हूं ना? त्याचवेळी अनिल कपूर आणि अमीर खान यांच्या प्रेमाची गणितं कच्ची वाटू लागली. पड्द्यावरच्या नायिका सोनाली सारखं दिसायचं स्वप्नं मागे पडलं. पूर्णपणे सगळं बदललं, काय ? बदललं म्हणणं कठीण आहे.
सुंदरतेची परिभाषा पुन्हा नवीन रुपाने समजू लागली. नवीन कन्सेप्ट : Beauty come in different shapes, sizes and colors be your own kind of beautiful. बदलत गेलेल्या वर्षांबरोबर काही नाही तर किमान हे तरी शिकलेच की स्वतः ला स्वीकारणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःला सांभाळणं, कौतुक म्हटलं तर कोणाला आवडत नाही.
प्रेमात अखंड बुडालेली गीत सर्वांनाच आवडली. खरंच प्रेमाची सुरवात स्वतःपासून गरजेची आहे. अपनी फेवरेट बनना दुनिया को Self Obsession लगे तो लगे। असं जगण्यात काही वाईट नाही आणि पुन्हा ते म्हणतात ना की सुंदरता तर पाहणाऱ्याच्या नजरेनुसार बदलत असते. तर कुठे कोणी भेटला असा की त्याची नजर असं सांगते की तू दुनियेतील सर्वात सुंदर मुलगी आहेस आणि तेव्हा गाणं वाजू लागलं की एक लडकी को देखा तो ऐसा लगा...तर थोडं मिरवून घ्या...
मनीषा कोईराला सारखे फिल्मी अंदाज आपल्या खऱ्या आयुष्यात आना. तोपर्यंत 'अपनी फेवरेट', बना जब वी मेट मधल्या गीत सारखं! 


- सिद्धी बोबडे

Sunday, 17 February 2019

विचार करणं एक नशा आहे

मी कधी कधी विचार करते,
की मी किती विचार करते,
मग अचानक स्वतःला सांगते की इतका नको विचार करू,
मग जेव्हा मी माझ्या आजू बाजूची दुनिया पाहते, तेंव्हा पुन्हा विचार करायला लागते की लोक का विचार करत नाहीत?
थोडा तरी विचार करायला पाहिजे...
आणि मी पुन्हा एका खोल, लांब विचारात गढून जाते.
विचार करणं पण कसं आहे
विनाकारण...
विनाहेतू...
अवेळी...
पण तरीही या विनाकारण, विनाहेतू, अवेळी आलेल्या विचारामध्ये काहीतरी आहे. जे वास्तववादी आहे!
खरंच! विचार करणं पण एक नशा आहे.

- सिद्धी बोबडे

Thursday, 31 January 2019

आपण पुन्हा भेटूया!

आपण पुन्हा भेटूया!
लोक प्रेमात पडल्यावर
दुनियेपेक्षा वेगळे होतात
वेगळी दुनिया बनवायची स्वप्न बघतात
धरतीच्या शेवटच्या स्तरावर
कोणत्यातरी पहाडाच्या दुसऱ्या बाजुस
सातासमुद्रापार
आपण भेटूया!
आपण भेटू, पण
याच दुनियेत
याच लोकांमध्ये
बंधनांच्या पलीकडे
आणि, रुसण्याच्या आनंदी काळात
आपण भेटूया!
या नैराश्या बरोबर
'तुझ्या आणि माझ्या रागात शोधूया आपलं प्रेम'
आपण भेटूया!
या परंपरावादी आणि रितीरिवाजाच्या
रुढीवादी समाजात
वेगवेगळ्या जाती, धर्म, लिंग, भाषा, रंगात जन्मलेला हा कडवेपणाचा काळ निघून जाईल काळाच्या आड
आपल्याला भेटण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही
आपण स्वतःही नाही
तू, तेंव्हाही माझ्यावर नाराज असशील
कारण, नेहमी प्रमाणे मी उशिरानेच येईल.
आणि, तेंव्हाही मी तुझ्यावर प्रेम करणार
कारण नेहमी प्रमाणे, तू माझी वाट पाहणार.
आपण पुन्हा भेटूया!

- सिद्धी बोबडे