साध्या साध्या गोष्टी आणि साधारण गरजांना आठवून कधी जाणीवच होत नाही की त्या इतक्या गरजेच्या असू शकतात.
कुठेतरी एक quote वाचलं होतं
I have water to drink
I have a running tap
clothes to wear
food to eat
bed to sleep
I am Lucky and I am thankful.
किती साधारण गोष्ट आहे. अनेक गोष्टी ज्या आता अचानक खूप मोठ्या वाटायला लागल्यात त्यांना आपण रोजच्या जीवनात किती हलक्यात घेतो, जसं सगळ्यावर आपला अधिकारच आहे.
काल रात्री जेवताना अचानक ती लहान मुलं आठवली जी थकली होतीे. आपल्या घरी परतत होती, गावी परतत होती. कुणी लहान लेकरू थकून आपल्या आईच्या मिठीत बिलगलं होतं, कुणाला थकल्याने चालायलाच जमत नव्हतं. काहींना तर आपण हा प्रवास का करतोय याचा अंदाजही नव्हता. हे सगळं आपल्याच वाट्याला का आलंय हा प्रश्नही पडत नसावा कदाचित ! मग विचार केला, कळत नाही हेच बरोबर असावं त्यांच्यासाठी, कळायला लागल्यावर आपलं कुणीच नाहीये, या देशात आपला विचार कुणीच करत नाही या विचारानेच अर्ध मरून जाण्यापेक्षा हे असं बरं असेल कदाचित. काय माहीत. माहीत नाही.
सध्या त्यांना फक्त भुकेचा विचार असावा. त्यांच्या भुकेचा अंदाजही लावता येणार नाही. तो माणूस पण आठवला, फेसबुकवर व्हिडिओ पाहिला होता त्याचा, जेवण मिळताच रडायला लागला. तीन दिवसा पासून भुकेला होता तो.
का कुणास ठाऊक पण जेवताना मला हे सगळं आठवत होतं. ती लोकं आठवत होती. आपल्याकडे सगळं बंद आहे पण तरीही त्याने आपल्याला खूप फरक पडलेला नाही हा विचार आता माझ्या मनाला खायला लागला होता. खाण्या-पिण्याच्या गोष्टीपासून ते इतर सगळ्या गरजेच्या किंवा गरज नसलेल्याही अतिरिक्त गोष्टी आपल्याला मिळत आहेत, फक्त आपला जन्म जरा बऱ्या घरात झाल्यामुळे, आपल्याकडे असलेल्या प्रिविलेजमुळे आहेत असं वाटत होतं. सकाळी उठून माझी लोकं माझ्यासोबत आहेत. मी शांत बसू शकते, एकांतात बसू शकते, वाटलं तर बोलू शकते, टीव्ही बघू शकते. वाटलं तर मित्र-मैत्रिनिंशी गप्पा मारता येतात फोनवर. फेसबुकवर मिम्स आहेतच, इन्स्टग्राम वर चॅलेंजेस आहेत. सगळं आहे हाताशी. याबद्दल मी आभार मानायला हवेत का, मला नाही माहीत.
ज्या देशात जवळपास १९ कोटी लोक रिकाम्या पोटाने झोपतात तिथे, उद्या माझ्यासमोर येणारं ताट किमान रिकामं नसेल हे मला आजच, आत्ताच माहितीये. तो प्रश्न मला सतावत नाही. मुळात तो माझा प्रश्न किमान आता तरी नाहीये. मी त्याव्यतिरिक्त विचार करू शकते. भरल्या पोटाने, तृप्त मनाने विचार करत लोळत पडता येतं, वाचता येतं, काही लिहता येतं, काही ना काही तरी दुसरं करता येतंय मला. हे ही काही कमी वाटत नाही.
तुम्ही पण व्यक्त व्हा. मला छान वाटतंय हे लिहून. तुम्हालाही वाटेल. स्वतःचा किंवा कसला फोटो जोडण्यात काही अर्थ वाटत नाही. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे फुल पुरेसंंय. 🌸
#Lockdown #lockdownDay14
#staypositive #staygrateful #thistooshallpass #stayhome #staysafe ✨
-सिद्धी बोबडे