Tuesday, 12 March 2019

शहरांच्या एकटेपणावर जालीम उपाय

तू बऱ्याच वर्षांनी अशा ठिकाणी भेट..... जे आपल्या दोघांसाठी अनोळखी असेल. लगेच ओळख दाखवू नकोस. विचार कर, काही आठव आणि मग जेव्हा आपल्या दोघांमधली आठवण आठवेल..... तेव्हा जरा हसून जमिनीकडे बघ. कारण माझ्या डोळ्यांकडे बघून कदाचित तुला हसू नाही येणार. मग माझं नाव घे, इतक्या हळू की मला ऐकू नाही येणार. पण मी मात्र नेहमीप्रमाणे तुझे ओठ वाचू शकेन. मग काही वेळ आपण दोघे शांत राहू. मग तू विचारशील की कशी आहेस ? मी म्हणेल त्या थंडी सारखी जिला आपण सोडून पुढे गेलो होतो. मग मी विचारेन तू कसा आहेस? तू उत्तर देशील थंडीतल्या त्या शेकोटी सारखा. मी म्हणेन जिला मी बऱ्याच वर्षांपासून मनात पेटवत ठेवलं आहे. मग दोघं एकत्र चालायला लागूया... तोपर्यंत जोपर्यंत हे अनोळखी शहर आपलं नाही वाटत. ऐकलं आहे प्रेम शहरांच्या एकटेपणावर जालीम उपाय आहे.

- सिद्धी बोबडे